


अपयश की नवी जाण?
मनासारखे मार्कस् मिळाले नाहीत तर त्याला अपयश मानणाऱ्यांची संख्या वाढत आहे. पण त्यातच अडकून पडलो तर पुढे जाताच येत नाही. नापास होणं वा कमी मार्कस् मिळणं, या अनुभवाला पार करून समंजसपणे पुढचा रस्ता निवडला आणि त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर ते वरदान ठरू शकतं..-नीलिमा किराणे
'ना पास झाल्यानंतर कसं वाटलं? त्या अनुभवांबद्दल आता बोलू या,' महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कार्यशाळेमध्ये आमच्यातल्या एका फॅसिलिटेटरनं नव्या विषयाला सुरुवात केली.
दोन दिवसांच्या या कार्यशाळेत अनेक विषयांवर शेअरिंग, गप्पा चालू होत्या. विविध शाखांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. यापूर्वी कधीच कुणाशी शेअर न केलेल्या पण मनात अडकून राहिलेल्या भावना मुलांनी अतिशय मोकळेपणे व्यक्त केल्या. त्या ओघात बोलता बोलता आम्ही मुद्दा घेतला, तो नापास झाल्यानंतरच्या अनुभवाचा. थोडा वेळ एकदम शांतता पसरली. 'मी नापास झालो / झाले होते,' असं चारचौघांत सांगणं अवघडच.
'चाचणीत, टय़ुटोरिअल्सला, दहावी-बारावी, सीईटी-कधीतरी, कशात तरी नापास झालेले किती जण आहेत?' फॅसिलिटेटरनं थोडा क्लू दिला. थबकत थबकत काही हात वर आले.
'कधीच कुठेच नापास झाले नाहीत, असे कितीजण आहेत?' अगदी थोडे- एक-दोन हात वर आले.
'आपण स्वतच्या/घरच्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात कमी पडलो, परीक्षेत पास होऊनही स्वतपुढे नापास झाल्यासारखं वाटलं, असे अपयशी वाटण्याचे अनुभव किती जणांकडे आहेत?'
या प्रश्नावर मात्र सगळेच हात वर झाले. सगळेच्या सगळे हात वर होतील अशी अपेक्षा मुलांनाही नव्हती. त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. विशेष म्हणजे सगळया फॅसिलिटेटर्सनीदेखील हात वर केले होते.
'थोडक्यात, नापास होण्याच्या भावनेचा अनुभव प्रत्येकानं एकदा तरी घेतलाच आहे. आपल्याला नापास झाल्यानंतर वाटलेल्या भावना आणि तेव्हा मनात आलेले विचार याबद्दल शेअिरग करायचंय. तेव्हा कसं वागायला हवं होतं? कोणाचं चुकलं होतं? कोण बरोबर होतं? असलं विश्लेषण आपल्याला मुळीच करायचं नाहीये, त्यामुळे मोकळेपणी बोला.'
आता चित्र एकदम पालटलं. प्रत्येकानं कधी ना कधी त्या हताश, असहाय्य, लाजिरवाण्या क्षणांचा अनुभव घेतलाय म्हटल्यानंतर एकमेकांपासून लपवण्यासारखं काही उरलंच नव्हतं. सगळे एका पातळीवर आल्यासारखं झालं. एक मुलगी पुढे आली.
'मी बारावीला सीईटीच्या मागे जास्त लागले होते. बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यास जास्त केलाच नव्हता. निकालानंतर बोर्डाच्या परीक्षेतही कमी पडले आणि सीईटीलाही निगेटिव्ह स्कोअरमुळे वाट लागली. बरेच दिवस काही सुधरतच नव्हतं. हरल्यासारखं वाटायचं. जीवच द्यावासा वाटायचा.'
'मी हौसेनं स्पॅनिशच्या क्लासला जात होतो. पहिल्या वर्षी काही कळतच नव्हतं. त्यामुळे परीक्षेला बसलोच नाही. 'ब्रेक घेतला' असं सर्वाना सांगायचो. पण खरं तर आपण नापासच झालात हे माहीत होतं. ती अस्वस्थता आणि तगमग मी अजूनही विसरलेलो नाही,' एका फॅसिलिटेटरनं शेअर केलं, तसा आणखी एकजण पुढे आला.
'दहावीला एक विषय राहिला तेव्हा खूप रडावंसं वाटत होतं. बाबा खूप चिडले, वाट्टेल ते बोलले, तेव्हा मात्र माझ्या मनाचा दगड झाला. 'मी काय मुद्दाम नापास झालोय का? माझ्या मनाचा कुणीच विचार करत नाही' असं खूप एकटं, हताश, असहाय्य वाटलं. बाबांसमोर मात्र मी काहीच दाखवलं नाही. मख्ख उभा होतो.'
मग प्रत्येकजण काही ना काही सांगायला लागला. एकजण आíकटेक्चरची प्रवेशपरीक्षा नापास झाल्यावर वैतागून कॉमर्सलाच गेली होती, तर एका हुशार मुलीला फाजील आत्मविश्वासामुळे महत्त्वाच्या टेस्टला शून्य मार्क मिळाले होते. अर्थशास्त्रात नापास झालेल्या एकानं तेवढा पेपर पुढच्या सत्रात 'क्लिअर' केला, पण नंतर अर्थशास्त्र सोडूनच दिलं. प्रत्येकाच्या कहाणीचा तपशील वेगवेगळा असला तरी नापास झाल्यानंतरची भावना मात्र सर्वाची सारखीच होती. खूप लाज वाटली होती. मानसुद्धा वर करवत नव्हती. आपल्याकडे पाहून प्रत्येकजण कुचेष्टेनं हसतोय, असं त्यांना वाटत होतं. बरेच दिवस निर्थक वाटत होता.
वैद्यक शाखेचा प्रवेश फक्त दोन मार्कानी गेलेला एकजण म्हणाला, 'मी आता 'बीएस्सी मायक्रो' करतोय. पण मेडिकलला गेलेल्या मित्रमत्रिणींना मी अजूनही टाळतो. कुणातच मिसळावंसं वाटत नाही.'
'पण कुणात न मिसळल्यामुळे तू मायक्रोच्या अभ्यासावर फोकस करू शकत असशील.'
'अं.. नाही. जास्त एकटं वाटतं. पहिल्या सत्राला खूप कमी मार्कस् मिळाले. माझं मनच लागत नाही. ही जागा आपली नाही, असं वाटत होतं,' तो उदासपणे म्हणाला.
'म्हणजे मेडिकल दुर्दैवानं गेलं आणि मायक्रो तू घालवतोयस. ही तीन र्वष संपल्यानंतर तू मनानं कुठे असशील जरा कल्पना करून बघ बरं. असाच दुखात असशील तर तीन र्वष मायक्रो करूनही तू बारावीच्या रिझल्टपाशी आणि त्या कमी पडलेल्या दोन मार्कापाशीच अडकला असशील का?
फॅसिलिटेटरच्या प्रश्नाचा रोख मायक्रोवाल्याच्या लक्षात आला आणि त्याच्यासोबत आणखीही काही मुलं विचारात पडली.
'मग तू पुढे काय केलंस?' फॅसिलिटेटर एकेकाला विचारू लागले.
'बाबांच्या संतापण्यानं मी तेवढय़ापुरता मख्खपणा केला खरा, पण नंतर आईनं जवळ घेऊन थोपटलं तेव्हा मात्र खूप रडलो. तिनं समजून घेतल्यावर मनातला राग, एकटं वाटणं कमी झालं. मी वर्षभर अभ्यास सोडून केलेल्या टवाळक्या आठवल्या, आईच्या विश्वासाचा फायदा घेतल्याचं वाईट वाटलं. मग मात्र अभ्यासाला भिडलो. ऑक्टोबरला उत्तम मार्क मिळवले. शिवाय वर्षभरात फोटोग्राफी, बेसिक इलेक्ट्रिशिअन असे एकदोन अभ्यासक्रम केले. त्यामुळे आपलं वर्ष वाया गेलं, असं मला मुळीच वाटलं नाही, आता घरातली इलेक्ट्रिकलची लहानसहान कामं मी करतोच, पण शेजारपाजारचेही काम देतात. माझा पॉकेटमनी निघतो.'
'मला मात्र यंदा एखादा विषय राहणार तर नाही ना? अशी धास्ती अजूनही दर परीक्षेत वाटते. पुन्हा कधी नापास झालो नाही. फक्त ती लाजिरवाणी भावना आणि भीती लक्षात राहिली आहे.' एकजण गंभीरपणे म्हणाला.
'पण त्यामुळे तू दरवर्षी चांगला अभ्यास करतोस ना? उलट ते एकदा नापास होणं तुला पथ्यावरच पडलंय.'
'खरंच की.' त्या मुलाचा चेहरा एकदम खुललाच. मग त्यानं फॅसिलिटेटरना विचारलं, तुमच्या स्पॅनिशचं काय झालं पुढे?'
'पुढच्या वर्षी दोन्ही वर्षांच्या परीक्षा एकदम देऊन दोन्हीत विशेष श्रेणी पटकावली. आता परदेशी जातो तेव्हा अस्खलित स्पॅनिश बोलतो, कधीकधी शिकवतोसुद्धा.' फॅसिलिटेटरनं उत्तर दिलं.
'शून्य मार्क घेतल्यावर तू काय केलंस? शोकागारात जाऊन बसलीस का?' त्यांनी शून्य मार्कवाल्या मुलीला विचारलं.
'हो.. म्हणजे दोन तीन दिवस तसं झालं खरं, पण नंतर माझ्या लक्षात आलं की 'मला सगळं येतंय' असं वाटण्यामुळे मी गाफील राहिले. आता मी कधीच ओव्हरकॉन्फिडन्समध्ये जात नाही. तसं कधी वाटलं की, आणखी अवघडवाले प्रॉब्लेम्स सोडवायला घेते, तिनं हसत सांगितलं. तिच्या खिलाडूपणाला सर्वानी टाळ्या वाजवून दाद दिली.
सीईटीवाली म्हणाली, 'आता काय करायचं? या विचारात थोडे दिवस उदास, भकास घालवले. एवढी र्वष मनात फक्त इंजिनीअिरगचा ध्यास होता. बीएस्सीत रस नव्हता. त्यामुळे काही सुचतच नव्हतं. एके दिवशी टाइमपास म्हणून टीव्ही पाहत बसले आणि मला एक अँकर खूप आवडली. एकदम वाटलं, 'बीएमएम करायला काय हरकत आहे?' वक्तृत्वस्पर्धा, अभिनयाची आवड होती, संवादक्षमता, व्हिज्युअल सेन्स उत्तम होता. फक्त एवढी र्वष डोक्यात इंजिनीअिरगच असल्यामुळे त्याकडे मी कधी करिअर म्हणून पाहिलं नव्हतं. मी बीएमएमला अॅडमिशन घेऊन टाकली. इंजिनीअर व्हायला खूप आवडलं असतं, पण हेसुद्धा मस्तच आहे. इथेही बुद्धीचा कस लागतोच की.' तिचा चेहरा खरंच समाधानी होता. काही हुकल्याची भावना तिथे नव्हती. ती तिचं काम मनापासून एन्जॉय करत होती.
फॅसिलिटेटर्सचं काम प्रश्न विचारून मुलांना विचाराला उद्युक्त करण्याचंच होतं. अभिप्राय, कॉमेंटस्, शेअिरग यातून मुलं त्यांची तेच वाट काढत होती. थोडय़ा वेळानंतर फॅसिलिटेटरनं खडू हातात घेत विचारलं, 'मित्रहो, एवढय़ा शेअिरगनंतर आता तुम्हाला कसं वाटतंय? काय नवीन मिळाल्यासारखं वाटतंय? जरा यादी करू या?' तशी एकेकानं सांगायला सुरुवात केली.
० प्रत्येकच जण कधी ना कधी, कुठे ना कुठे नापास झालेला असतो. त्यामुळे आपणच एकटे आहोत, असं एवढी र्वष कशाला धरून बसलो?
० दुर्दैवानं आपण नापास झालोच तर स्वतशीच कुढत राहणं चूक आहे. आपल्या भावना कुणाशी तरी शेअर करायला पाहिजेत.
० 'कोण काय म्हणेल? मी कुणाला तोंड कसं दाखवू?' अशा लाज वाटून घेण्यानं आपणच स्वतला एकदम बाद समजायला लागतो. एकटं करून घेतो.
० आपण नापास झालोय किंवा हव्या त्या कोर्सला जाता येणार नाहीये हे जेवढय़ा लवकर स्वीकारता येईल, तेवढय़ा लवकर त्यातून बाहेर पडून दुसरा रस्ता शोधता येतो.
० पाहिजे ते तर हातातून गेलेलंच असतं, पण कित्येक र्वष त्याच दुखात राहून पुढचं आयुष्य आपलं आपण दुखी करून घेतो.
यादी करता करता एकेकाच्या मनातला नापास झाल्याच्या दुखाचा, वेदनेचा ब्लॉक निघत गेला. एवढे दिवस मनात बाळगलेलं ओझं एकदम हलकं झालं होतं. एका गटातल्या मुलांचे चेहरे मात्र गोंधळलेले दिसत होते. एकजण म्हणाला, 'नापास झालो तरी लाज वाटायचं कारण नाही. ते सोडून द्यायचं असं म्हणायचंय का तुम्हाला?
मग हा प्रश्नही चच्रेत घेतला. आपल्याला एकत्रितपणे जे म्हणायचंय ते चार ओळीत 'थोडक्यात आणि नेमकं' करू या, यासाठी आम्ही मुलांनाच वेळ दिला. उलटसुलट मंथनानंतर मुलांनी जे शब्दांत आणलं, ते खरंच 'थोडक्यात आणि नेमकं' होतं.
'नापास झाल्याचं किंवा आपण कमी पडल्याचं वाईट वाटणारच, लाजही वाटणारच, पण त्यातच अडकून फक्त त्याचाच विचार करत उदास राहणं चुकीचं आहे. नापास होणंसुद्धा वेश बदललेल्या वरदानासारखंच असू शकतं. A boon in disguise म्हणतात तसं. आपण त्याच्या नापासपणातच अडकून पडलो तर पुढे जाताच येत नाही. मग ते शापासारखं काम करतं. त्या अनुभवाला पार करून आपण समंजसपणे पुढचा रस्ता निवडला आणि त्यासाठी प्रामाणिकपणे ऊर्जा लावली तर ते वरदान ठरतं. त्यातून आपल्याला स्वतबद्दलचं एक वेगळं भान आणि जगाची एक नवी जाण येऊ शकते.
No comments:
Post a Comment