Saturday, 8 June 2013

शैक्षणिक उपक्रम



शैक्षणिक उपक्रम
आश्रमशाळा  म्हटले  कि २४  तास ड्युटी अशी भावना निर्माण झालेली आहे. त्यामुळे शाळेत  वर्ग अध्यापनाव्यतिरिक्त  इतर उपक्रमांना फाटा दिला जातो. काही उपक्रम हे फक्त निमित्तमात्र असतात. तर काही कागदावरच असतात.  त्यामुळे  शाळा  हे वातावरण  आश्रमशाळेत न राहता त्याला खानावळीचे  स्वरूप प्राप्त  होते. यातून होणारे विद्यार्थ्यांचे  नुकसान टाळण्यासाठी मी माझ्यासाठी खालील उपक्रम सुचविले आहेत. 

१. डिजिटल स्कूल: पद्मश्री डॉ.विजय भटकर यांच्या ETH या संस्थेच्या मदतीने बऱ्याच शाळा आता. "डिजिटल स्कूल" म्हणून नावारूपास आलेल्या आहेत. माहिती आणि संचार तंत्रज्ञानाच्या साह्याने अध्ययन, अध्यापन, व्यवस्थापन व समन्वयातून शिक्षणाचा दर्जा उंचावायचा प्रयत्न केला जात आहे. पाठ्यपुस्तकातील धडे व कवितांचा आशय समजून घेतल्यानंतर अनिमेशनच्या तंत्रामुळे विद्यार्थी दृकश्राव्य अनुभवही घेणे आता यातून शक्य झाले आहे. अनिमेटेड फिल्म्स, मनोरंजक उपक्रम स्वाध्याय, चाचण्या, खेळ यांच्या मदतीने शिकताना विद्यार्थ्यांना निरनिराळ्या विषयांची गोडी लावल्यास अध्ययन अध्यापन प्रक्रिया अधिक गतिमान होऊ शकते. म्हणून अधिकाधिक शाळांनी डिजिटल स्कूल साठी  आपल्या पातळींवर प्रयत्न करणे गरजेचे आहे. 

 
 २. इंटरनेटच्या मदतीने शिक्षण: शाळेतील विद्यार्थी विविध संकेत स्थळांना भेटी देऊन माहिती घेऊ शकतात. टिपण काढू शकतात. त्यामुळे अध्ययन-अध्यापन प्रक्रिया प्रभावी होऊ शकते. इंटरनेटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे माहिती तंत्रज्ञानाने निर्माण केलेल्या माहितीच्या महाजालाशी नाते निर्माण झाले, तर ज्ञानभांडार त्यांच्यासाठी खुले होइल.

३. परिसर भेट: मुलांचे अनुभव विश्व व भाव विश्व समृद्ध करणार्या निरनिराळ्या ठिकाणांना विद्यार्थी भेटी देणे गरजेचे आहे.  यामुळे विद्यार्थी स्वतः माहिती घेतील व यातून त्यांच्या ज्ञानाची कक्षा रुंदावण्यास मदत होईल . उदा. न्यायालय, आठवडे बाजार, तुरुंग, पोलीस स्टेशन, वीट भट्ट्या, सुतारनेट, शेती, किरण, दुकान, पिठाची गिरणी, बँका, शेती सेवा केंद्र इत्यादी.

४. पर्यावरण संवर्धन: विद्यार्थ्यांना परिसरात झाडे लावण्यास प्रोत्साहित करावे. त्याचे संगोपनही त्यांना करण्यास  सांगावे. दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी मुलांना झाडांना राख्या बांधावयास सांगून त्यांचे एका अर्थाने पालकत्व स्वीकारत असल्याची जाणीव त्यांना करून द्यावी.

५. हस्तलिखित: दरवर्षी  हस्तलिखित शाळेच्या वतीने तयार केले जावे. सदर हस्तलिखितविद्यार्थ्यांना आपल्या भाषा प्रकारात लिहिण्यास साङ्गावे. ग्रामीण, आदिवासी विद्यार्थ्यांची भाषा ते प्रमाणभाषा तसेच कुटुंब व  शाळा यांना जोडणारा सेतू म्हणून या उपक्रमाचे आगळे महत्त्व आहे. आदिवासी भागातील विद्यार्थी कमी बोलतात. लिहिताना कसेबसे लिहितात. लेखनाच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या भाषेत व्यक्त होता यावे म्हणून प्रमाणभाषा तसेच व्याकरण याला फाटा देऊन विद्यार्थी मुक्तपणे या हस्तलिखितात लिहू शकतील असे वातावरण निर्माण करावे.

६. शेतीची अवजारे: पारंपरिक पद्धतीने शेतीची मशागत करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अवजारांचा शाळेत संग्रह करावा.   त्या अवजारांची नावे, त्यांचे उपयोग, हे अवजारे वापरल्याने होणारे फायदे विद्यार्थ्यांना सांगावयास प्रोत्साहित करावे.

७. फिल्म डे: विविध भाषांतील वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट शाळेत दाखवले जावेत. त्यावर चर्चा केली जावी. विद्यार्थी आपली मते मांडतील . मनोरंजनातून शिक्षण हा यामागील उद्देश आहेच याशिवाय एखाद्या गोष्टीची चिकित्सा करण्याचा वस्तुपाठ म्हणजे हा उपक्रम होय.

८. स्वच्छता दिवस: आठवडयातून एका दिवशी विद्यार्थ्याची वैयक्तिक स्वच्छता तपासली जावी . आदिवासी विद्यार्थी स्वच्छतेच्या सवयीच्या बाबतीत कधी-कधी दुर्लक्ष करतात.  परंतु स्वच्छता दिवस या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना  स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे सहज शक्य आहे. त्यामुळे स्वच्छतेच्या सवयी अंगिकारण्याने विद्यार्थी आजारी पडण्याचे प्रमाण कमी होईल.

९. जंगलवाचन: विद्यार्थ्यांना परिसरातील जंगलाची सहल घडविताना प्रत्यक्ष अनुभूतीने शिक्षण दिले जावे. झाडे, वेळी, फुले, पशु-पक्षी, डोंगर- दऱ्या, या विषयाची माहिती स्थानिक माहितगार लोक विद्यार्थ्यांना सांगू  शकतील असे नियोजन करावे.

१०. वाचन संस्कार: विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याची गरज आहे. परिपाठात श्यामची आई, एक होता कार्व्हर यासारख्या पुस्तकांचे प्रकट वाचन घेतले पाहिजे. वाचलेल्या पुस्तकावर विद्यार्थी गटागटात  बसून चर्चा करतील असे नियोजन करावे. 
 
११. कात्रण संग्रह: विद्यार्थ्यांना वर्तमानपत्रे वाचनाची गोडी निर्माण करावी. त्यातील विविध विषयांवरील बातम्या, छायाचित्रे, यांची कात्रणे काढण्यास सांगावे. ती वहीत चिकटविण्यास सांगावे. ऑलिंपिक, पंढरीची वारी, संगणक, जलोत्सव, बोधकथा, खेळ आदी विषयावर आधारित कात्रण संग्रह विद्यार्थ्यांनी केले तर वर्षा अखेरीस मोठा संग्रह होऊ शकेल.
 
१२. शब्दाची बाग : शाळेसमोरील भिंतीवरील दगडांना निरनिराळे रंग देऊन त्यावर इंग्रजी, मराठी, हिंदी भाषांतील शब्द लिहिले जावेत. त्यात धरणांची, जिल्ह्यांची, किल्ल्यांची, संतांची, वर्तमानपात्रांची नावे, जोडाक्षरे लिहावीत. त्यातून मुलांना  भाषिक खेळ व प्रश्नमंजुषा खेळण्याची सवय लावावी. वाचन तसेच सामान्य ज्ञान या बाबी सुधारण्यासाठी याचा उपयोग होतो.

१३. हस्ताक्षर सुधार प्रकल्प: विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुधारण्यासाठी या प्रकल्पाचा फायदा होतो. देवनागरी लिपीतील मुळाक्षरे योग्य पद्धतीने लिहिण्यासाठी विशेष मार्गदर्शन केले जावे  व सराव घेतला पाहिजे.

१४. छंदवर्ग: नृत्य, गायन, वादन, वक्तृत्व, पाठांतर, रांगोळी, रंगभरण, वाचन, भटकंती, निरीक्षण आदि छंदांची जोपासना व्हावी यासाठी शाळेत छंद वर्गांचे आयोजन केले जावे. त्यातून विद्यार्थ्यांच्या निरनिराळ्या कलागुणांना खतपाणी घालताना व्यासपीठही उपलब्ध करून दिले जाईल.

१५. विद्यार्थी वाढदिवस: दैनंदिन जीवन संघर्षात आणि रोजीरोटीच्या प्रश्नात ग्रस्त असणाऱ्या आदिवासी कुटुंबात मुलांचे कोडकौतुक करायला आई-वडिलांना वेळ नसतो त्यामुळे वाढदिवस ही कल्पनाच आदिवासी मुलांना माहित नसते. इतर मुलांचे वाढदिवस पाहताना ती मुले मनातल्या मनात कुढतात. शाळेने प्रत्येक मुलाचा वाढदिवस साजरा करावा.  त्यांच्या कानावरही हॅप्पी बर्थ डे... चे सूर पडू द्यावेत.

१६. फटाकेमुक्त शाळा: पर्यावरण रक्षणासाठी शिक्षकांनी जाणीव-जागृती करावी. शिक्षकांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी फटाके मुक्त दिवाळी साजरी केली पाहिजे. फटाके न वाजविण्याची शपथच मुलांना घ्यायला सांगावी. परंतु त्या अगोदर उद्बोधन करावे.

१७. क्रीडा: मुलांना विविध योगासने, सामुदायिक कवायत करण्यास सांगावे. विविध खेळ खेळण्याची गोडी निर्माण करावी. झाडावर चढणे, डोंगर चढणे असे निरनिराळे खेळही खेळण्यास सांगावे.

१८. विविध गुणदर्शन: दरवर्षी विविध गुणदर्शन कार्यक्रमांचे आयोजन केले जावे. शाळेतील १०० टक्के विद्यार्थी यात सहभागी होतील याचे नियोजन करावे. रंगमंचावर येऊन आपली कला सादर करताना त्यांना नवा आत्मविश्वास प्राप्त होईल…. .

No comments:

Post a Comment