Thursday, 6 June 2013

दहावीनंतरचे करिअर

दहावीनंतरचे करिअर

‘दहावीचे वर्ष आहे, तुझ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट. त्यामुळे अभ्यास नीट कर,’ असा संवाद प्रत्येक घरात कधीना कधी ऐकायला मिळालेला असतो. शाळा संपून कॉलेजची सुरुवात जशी होते, तसेच करिअरच्या दृष्टीकोनातूनही हे वर्ष महत्त्वाचे असते. दहावीपर्यंत एकसमान शिक्षण असते, त्यानंतर मात्र एका शाखेची निश्चित निवड करायची असते. त्यासाठी गुणांची स्पर्धाही असते. तसेच, विद्यार्थ्याची आकलनक्षमता आणि आवड यांचाही विचार करण्याची गरज असते.
पूर्वी दहावीनंतर विज्ञान, कला आणि कॉमर्स या तीन शाखांचाच प्रामुख्याने पर्याय होता. आता या तीन शाखांमधूनच आणि त्यांच्याशिवाय अनेक पर्याय उपलब्ध आहेत. विज्ञान शाखेतून शिकताना, गणित किंवा जीवशास्त्र अशी निवड करावी लागते. गणितासह बारावी पूर्ण केल्यानंतर, इंजिनीअरिंग, आर्किटेक्चर, बीसीएस असे पर्याय आहेत. जीवशास्त्रासह बारावी पूर्ण केल्यानंतर, मेडिकलच्या शाखांना प्रवेश घेता येऊ शकतो. या दोन्ही विषयांसह किंवा एक विषय घेऊन बारावी झाल्यानंतरही, बीएस्सी, बीफार्मसी यांसारख्या शाखांमधून पदवी पूर्ण करता येते. कला शाखेला प्रवेश घेऊन पारंपरिक शिक्षण घेत एखादी स्वतंत्र कला जोपासावी, हा या शाखेचा मुख्य उद्देश आहे. या शाखेचा अभ्यास करत, स्पर्धा परीक्षांचा अभ्यासही होऊ शकतो. कॉमर्स शाखेतून पारंपरिक पद्धतीने अकाउंटंटही होता येते. सीएसारखा उच्चपदस्थ व्यवसायही याच शाखेतून मिळवता येऊ शकतो. याशिवाय, व्यवस्थापन क्षेत्र वेगाने वाढत आहे. त्यामुळे, एमबीए, बीबीएसारखे शिक्षण कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना सोपे जाऊ शकते. पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये प्रवेश घेत, थेट इंजिनीअरिंगलाही प्रवेश मिळतो. स्वतंत्र व्यवसाय किंवा हमखास नोकरीसाठी आयटीआयचाही पर्याय असतो. या पारंपरिक शिक्षणाबरोबरच फॅशन डिझायनिंग, हॉटेल मॅनेजमेंट, सौंदर्यशास्त्र, पत्रकारिता यांसारख्या अभ्यासक्रमांचाही दहावीनंतरच विचार करता येऊ शकतो.
पर्यायांची यादी समोर असली, तरी विद्यार्थ्याच्या आकलन क्षमतेचा आणि आवडीचा विचार व्हायला हवा. त्याला एखाद्या विषयात गती असेल, तर त्यातून त्याची प्रगती होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळेच दहावीनंतर पर्यायांची निवड करताना, विद्यार्थ्याचा कल लक्षात घेणे सर्वांत महत्त्वाचे आहे.

No comments:

Post a Comment