Saturday, 8 June 2013

शैक्षणिक उपक्रम

शैक्षणिक उपक्रम
आश्रमशाळा  म्हटले  कि २४  तास ड्युटी अशी भावना निर्माण झालेली आहे. त्यामुळे शाळेत  वर्ग अध्यापनाव्यतिरिक्त  इतर उपक्रमांना फाटा दिला जातो. काही उपक्रम हे फक्त निमित्तमात्र असतात. तर काही कागदावरच असतात.  त्यामुळे  शाळा  हे वातावरण  आश्रमशाळेत न राहता त्याला खानावळीचे  स्वरूप प्राप्त  होते. यातून होणारे विद्यार्थ्यांचे  नुकसान टाळण्यासाठी मी माझ्यासाठी खालील उपक्रम सुचविले आहेत. 

१. डिजिटल स्कूल: पद्मश्री डॉ.विजय भटकर यांच्या ETH या संस्थेच्या मदतीने बऱ्याच शाळा आता. "डिजिटल स्कूल" म्हणून नावारूपास आलेल्या आहेत. माहिती आणि संचार तंत्रज्ञानाच्या साह्याने अध्ययन, अध्यापन, व्यवस्थापन व समन्वयातून शिक्षणाचा दर्जा उंचावायचा प्रयत्न केला जात आहे. पाठ्यपुस्तकातील धडे व कवितांचा आशय समजून घेतल्यानंतर अनिमेशनच्या तंत्रामुळे विद्यार्थी दृकश्राव्य अनुभवही घेणे आता यातून शक्य झाले आहे. अनिमेटेड फिल्म्स, मनोरंजक उपक्रम स्वाध्याय, चाचण्या, खेळ यांच्या मदतीने शिकताना विद्यार्थ्यांना निरनिराळ्या विषयांची गोडी लावल्यास अध्ययन अध्यापन प्रक्रिया अधिक गतिमान होऊ शकते. म्हणून अधिकाधिक शाळांनी डिजिटल स्कूल साठी  आपल्या पातळींवर प्रयत्न करणे गरजेचे आहे. 

 २. इंटरनेटच्या मदतीने शिक्षण: शाळेतील विद्यार्थी विविध संकेत स्थळांना भेटी देऊन माहिती घेऊ शकतात. टिपण काढू शकतात. त्यामुळे अध्ययन-अध्यापन प्रक्रिया प्रभावी होऊ शकते. इंटरनेटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे माहिती तंत्रज्ञानाने निर्माण केलेल्या माहितीच्या महाजालाशी नाते निर्माण झाले, तर ज्ञानभांडार त्यांच्यासाठी खुले होइल.

३. परिसर भेट: मुलांचे अनुभव विश्व व भाव विश्व समृद्ध करणार्या निरनिराळ्या ठिकाणांना विद्यार्थी भेटी देणे गरजेचे आहे.  यामुळे विद्यार्थी स्वतः माहिती घेतील व यातून त्यांच्या ज्ञानाची कक्षा रुंदावण्यास मदत होईल . उदा. न्यायालय, आठवडे बाजार, तुरुंग, पोलीस स्टेशन, वीट भट्ट्या, सुतारनेट, शेती, किरण, दुकान, पिठाची गिरणी, बँका, शेती सेवा केंद्र इत्यादी.

४. पर्यावरण संवर्धन: विद्यार्थ्यांना परिसरात झाडे लावण्यास प्रोत्साहित करावे. त्याचे संगोपनही त्यांना करण्यास  सांगावे. दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी मुलांना झाडांना राख्या बांधावयास सांगून त्यांचे एका अर्थाने पालकत्व स्वीकारत असल्याची जाणीव त्यांना करून द्यावी.

५. हस्तलिखित: दरवर्षी  हस्तलिखित शाळेच्या वतीने तयार केले जावे. सदर हस्तलिखितविद्यार्थ्यांना आपल्या भाषा प्रकारात लिहिण्यास साङ्गावे. ग्रामीण, आदिवासी विद्यार्थ्यांची भाषा ते प्रमाणभाषा तसेच कुटुंब व  शाळा यांना जोडणारा सेतू म्हणून या उपक्रमाचे आगळे महत्त्व आहे. आदिवासी भागातील विद्यार्थी कमी बोलतात. लिहिताना कसेबसे लिहितात. लेखनाच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या भाषेत व्यक्त होता यावे म्हणून प्रमाणभाषा तसेच व्याकरण याला फाटा देऊन विद्यार्थी मुक्तपणे या हस्तलिखितात लिहू शकतील असे वातावरण निर्माण करावे.

६. शेतीची अवजारे: पारंपरिक पद्धतीने शेतीची मशागत करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अवजारांचा शाळेत संग्रह करावा.   त्या अवजारांची नावे, त्यांचे उपयोग, हे अवजारे वापरल्याने होणारे फायदे विद्यार्थ्यांना सांगावयास प्रोत्साहित करावे.

७. फिल्म डे: विविध भाषांतील वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट शाळेत दाखवले जावेत. त्यावर चर्चा केली जावी. विद्यार्थी आपली मते मांडतील . मनोरंजनातून शिक्षण हा यामागील उद्देश आहेच याशिवाय एखाद्या गोष्टीची चिकित्सा करण्याचा वस्तुपाठ म्हणजे हा उपक्रम होय.

८. स्वच्छता दिवस: आठवडयातून एका दिवशी विद्यार्थ्याची वैयक्तिक स्वच्छता तपासली जावी . आदिवासी विद्यार्थी स्वच्छतेच्या सवयीच्या बाबतीत कधी-कधी दुर्लक्ष करतात.  परंतु स्वच्छता दिवस या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना  स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे सहज शक्य आहे. त्यामुळे स्वच्छतेच्या सवयी अंगिकारण्याने विद्यार्थी आजारी पडण्याचे प्रमाण कमी होईल.

९. जंगलवाचन: विद्यार्थ्यांना परिसरातील जंगलाची सहल घडविताना प्रत्यक्ष अनुभूतीने शिक्षण दिले जावे. झाडे, वेळी, फुले, पशु-पक्षी, डोंगर- दऱ्या, या विषयाची माहिती स्थानिक माहितगार लोक विद्यार्थ्यांना सांगू  शकतील असे नियोजन करावे.

१०. वाचन संस्कार: विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याची गरज आहे. परिपाठात श्यामची आई, एक होता कार्व्हर यासारख्या पुस्तकांचे प्रकट वाचन घेतले पाहिजे. वाचलेल्या पुस्तकावर विद्यार्थी गटागटात  बसून चर्चा करतील असे नियोजन करावे. 
 
११. कात्रण संग्रह: विद्यार्थ्यांना वर्तमानपत्रे वाचनाची गोडी निर्माण करावी. त्यातील विविध विषयांवरील बातम्या, छायाचित्रे, यांची कात्रणे काढण्यास सांगावे. ती वहीत चिकटविण्यास सांगावे. ऑलिंपिक, पंढरीची वारी, संगणक, जलोत्सव, बोधकथा, खेळ आदी विषयावर आधारित कात्रण संग्रह विद्यार्थ्यांनी केले तर वर्षा अखेरीस मोठा संग्रह होऊ शकेल.
 
१२. शब्दाची बाग : शाळेसमोरील भिंतीवरील दगडांना निरनिराळे रंग देऊन त्यावर इंग्रजी, मराठी, हिंदी भाषांतील शब्द लिहिले जावेत. त्यात धरणांची, जिल्ह्यांची, किल्ल्यांची, संतांची, वर्तमानपात्रांची नावे, जोडाक्षरे लिहावीत. त्यातून मुलांना  भाषिक खेळ व प्रश्नमंजुषा खेळण्याची सवय लावावी. वाचन तसेच सामान्य ज्ञान या बाबी सुधारण्यासाठी याचा उपयोग होतो.

१३. हस्ताक्षर सुधार प्रकल्प: विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुधारण्यासाठी या प्रकल्पाचा फायदा होतो. देवनागरी लिपीतील मुळाक्षरे योग्य पद्धतीने लिहिण्यासाठी विशेष मार्गदर्शन केले जावे  व सराव घेतला पाहिजे.

१४. छंदवर्ग: नृत्य, गायन, वादन, वक्तृत्व, पाठांतर, रांगोळी, रंगभरण, वाचन, भटकंती, निरीक्षण आदि छंदांची जोपासना व्हावी यासाठी शाळेत छंद वर्गांचे आयोजन केले जावे. त्यातून विद्यार्थ्यांच्या निरनिराळ्या कलागुणांना खतपाणी घालताना व्यासपीठही उपलब्ध करून दिले जाईल.

१५. विद्यार्थी वाढदिवस: दैनंदिन जीवन संघर्षात आणि रोजीरोटीच्या प्रश्नात ग्रस्त असणाऱ्या आदिवासी कुटुंबात मुलांचे कोडकौतुक करायला आई-वडिलांना वेळ नसतो त्यामुळे वाढदिवस ही कल्पनाच आदिवासी मुलांना माहित नसते. इतर मुलांचे वाढदिवस पाहताना ती मुले मनातल्या मनात कुढतात. शाळेने प्रत्येक मुलाचा वाढदिवस साजरा करावा.  त्यांच्या कानावरही हॅप्पी बर्थ डे... चे सूर पडू द्यावेत.

१६. फटाकेमुक्त शाळा: पर्यावरण रक्षणासाठी शिक्षकांनी जाणीव-जागृती करावी. शिक्षकांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी फटाके मुक्त दिवाळी साजरी केली पाहिजे. फटाके न वाजविण्याची शपथच मुलांना घ्यायला सांगावी. परंतु त्या अगोदर उद्बोधन करावे.

१७. क्रीडा: मुलांना विविध योगासने, सामुदायिक कवायत करण्यास सांगावे. विविध खेळ खेळण्याची गोडी निर्माण करावी. झाडावर चढणे, डोंगर चढणे असे निरनिराळे खेळही खेळण्यास सांगावे.

१८. विविध गुणदर्शन: दरवर्षी विविध गुणदर्शन कार्यक्रमांचे आयोजन केले जावे. शाळेतील १०० टक्के विद्यार्थी यात सहभागी होतील याचे नियोजन करावे. रंगमंचावर येऊन आपली कला सादर करताना त्यांना नवा आत्मविश्वास प्राप्त होईल…. .

Thursday, 6 June 2013

शिक्षक, मार्गदर्शक आणि पालकांची भूमिका

शिक्षक, मार्गदर्शक आणि पालकांची भूमिका

प्रकल्पासाठी योग्य विषय निवडण्यासाठी, प्रकल्पाची कार्यपद्धती ठरवण्यासाठी, प्रकल्पाला लागणारी साधनसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी तसंच निरीक्षणं घेण्याकरिता विद्यार्थ्यांना ठरावीक ठिकाणी घेऊन जाण्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षकांची किंवा पालकांची मदत लागते. प्रकल्पाचा विषय निवडल्यावर त्या विषयाची अधिक माहिती मिळवण्यासाठी पुस्तकं, वैज्ञानिक नियतकालिकं, गॅझेटस्, नकाशे, शासनातर्फे वेळोवेळी प्रकाशित झालेली माहिती व अहवाल, इंटरनेट वेब दालनं असे वेगवेगळे संदर्भ पाहणं आवश्यक ठरतं. हे संदर्भ विद्यार्थ्यांला उपलब्ध करून देण्यात पालक, शिक्षक आणि तज्ज्ञ मार्गदर्शकाची भूमिका महत्त्वाची ठरते.
प्रकल्पाचा विषय निवडल्यावर वैज्ञानिक कार्यपद्धती समजावून देणे, निरीक्षणाच्या वेगवेगळ्या पद्धतींची माहिती करून देणे आणि प्रकल्पाची एकंदर दिशा काय असावी, यासंदर्भात मार्गदर्शन करणे हे तज्ज्ञ मार्गदर्शकाचं काम असतं. मार्गदर्शक हा त्याच्या क्षेत्रामध्ये तज्ज्ञ असतो. त्याचप्रमाणे अनेक तज्ज्ञांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये वैज्ञानिक संशोधनदेखील केलेलं असतं. पण अशा वेळी एक मोठा धोका संभवतो. तो म्हणजे, विद्यार्थ्यांचा आवाका आणि त्यांचा पाठय़क्रम लक्षात न घेता प्रकल्पासाठी मार्गदर्शन केलं जातं. काही वेळा तज्ज्ञ मार्गदर्शकाच्या विद्यार्थ्यांकडून अवास्तव अपेक्षा असतात, ज्या विद्यार्थी पूर्ण करू शकत नाहीत.
विद्यार्थ्यांचा प्रकल्प उत्तम दर्जाचा व्हावा आणि प्रकल्प केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी, यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकाने विद्यार्थ्यांचा आवाका, त्यांचा पाठय़क्रम, त्यांना भेडसावणाऱ्या समस्या, प्रकल्प करताना येणाऱ्या अडचणी इत्यादी गोष्टी लक्षात घेऊन त्यानुसार मार्गदर्शन करणं आवश्यक आहे.
आपल्या मुलाला एखादा वैज्ञानिक प्रकल्प करायचा आहे, हे ऐकून काही वेळा पालकांमध्येच इतका उत्साह संचारतो की, त्या उत्साहाच्या जोशात ते स्वत:च प्रकल्प करायला घेतात. प्रकल्प मुलाला करायला सांगितलेला असतो, पण संपूर्ण प्रकल्प पालकच पूर्ण करून देतात. आपल्या मुलाला हे सगळं जमणार नाही किंवा त्याच्या हातून चुका होतील अशी भीती या पालकांना वाटत असते. प्रत्येक मूल हे धडपडत, चुका करतच शिकत असतं, हे पालकांनी लक्षात घेतलं पाहिजे. अशा वेळी आपली मतं विद्यार्थ्यांवर लादली जाण्याचा मोठा धोका असतो. त्यामुळे प्रकल्प करताना काही चुका होणं, काही गोष्टी करायच्या राहून जाणं, या गोष्टी स्वाभाविक आहेत. पण जे काम तो विद्यार्थी करेल, मग भलेही ते तोडकंमोडकं असेल, कदाचित अपूर्णही असेल, पण ते काम त्याने स्वत: केलेलं असेल. या गोष्टीचं समाधान आपल्या मुलाला मिळू देण्याची जबाबदारी पालकांची आहे. मुलाला सांगितलेला प्रकल्प आपणच करून दिला तर आपण त्याला मिळणारा स्वनिर्मितीचा आनंद हिरावून घेत आहोत, ही जाणीव पालकांनी ठेवायला हवी. आता याचं दुसरं टोक म्हणजे, 'घरात बसून सरळ अभ्यास करता येत नाही का?', 'हे काय नवीन खूळ काढलंय अभ्यासक्रमात?', 'प्रकल्प केल्यामुळे आमच्या मुलाला काय मिळणार?', 'प्रकल्प करण्यासाठी इतकी सगळी उठाठेव करावी लागत असेल तर प्रकल्प न केलेलाच बरा!', 'आमच्या वेळी हे असलं काही नव्हतं, कशाला हव्यात या नसत्या उठाठेवी?' अशाही प्रतिक्रिया काही पालक व्यक्त करतात.
प्रकल्प करण्याचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे अनेक लाभ आहेत. पहिलं म्हणजे, जेव्हा प्रकल्पासाठी एखादा विषय निवडला जातो, तेव्हा आपल्याला भेडसावणाऱ्या समस्या कोणत्या, हे शोधायला विद्यार्थी शिकतो. समस्या ओळखून त्या समस्येचा शास्त्रीय पद्धतीने वेध घेण्याची सवय विद्यार्थ्यांला लागते. त्याचप्रमाणे जेव्हा या संदर्भातली प्राथमिक माहिती विद्यार्थी मिळवतो, निरीक्षणं घेतो, निरीक्षणांच्या विश्लेषणातून निष्कर्ष काढतो आणि या निष्कर्षांच्या आधारे समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला अनेक गोष्टींबद्दल ज्ञान मिळतं.
पाठय़पुस्तकात उल्लेख असलेल्या अनेक संकल्पनासुद्धा प्रत्यक्ष निरीक्षण, क्षेत्र अभ्यास किंवा सर्वेक्षणामुळे चांगल्या प्रकारे समजण्यासाठी प्रकल्पाचा उपयोग होऊ शकतो.
प्रकल्पाचा आराखडा आणि कार्यपद्धती ठरवताना एखाद्या गोष्टीचं नियोजन कसं करावं, वेळापत्रक कसं करावं, आयत्या वेळी आलेल्या समस्यांमुळे वेळापत्रकातील काही गोष्टी करता आल्या नाहीत तर काय तोडगा काढायचा, अशा अनेक गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात.
प्रकल्पासाठी समाजातल्या वेगवेगळया स्तरातील व्यक्तींना भेटावं लागतं, त्यांच्याशी संवाद साधून माहिती मिळवावी लागते. यामधून दुसऱ्याशी कसं बोलावं, याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना मिळतो. प्रकल्पाच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देता येतात. या ठिकाणी मिळालेल्या अनुभवाचा लाभ पुस्तकी ज्ञानापेक्षा कितीतरी जास्त होतो आणि त्याचा परिणाम मनावर कायमचा राहतो. प्रकल्पामध्ये कराव्या लागणाऱ्या निरीक्षणांमुळे विद्यार्थ्यांची निरीक्षणशक्ती वाढते. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या शास्त्रीय पद्धती वापरून अचूक निरीक्षणं कशी घ्यावीत, हे प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समजतं. प्रकल्पाचं अहवाल लेखन आणि सादरीकरण यातून एखादा विषय आपण नेमक्या शब्दात पण प्रभावीपणे कसा मांडायचा, हे विद्यार्थी शिकतो.
थोडक्यात, प्रकल्प म्हणजे विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीला, विचारांना, सर्जनशीलतेला प्रचंड वाव देणारी आणि एखाद्या विषयाकडे साकल्याने पाहण्याची दृष्टी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणारी ही एक पद्धती आहे. त्यामुळे आपल्या पाल्याला विचारांचं आणि कृतीचं पूर्ण स्वातंत्र देऊन प्रकल्प करण्यासाठी प्रोत्साहन देणं गरजेचं आहे.
अनेकदा शिक्षकदेखील प्रकल्पाचा बाऊ करतात. प्रकल्प करायचा म्हणजे आपला जास्तीत जास्त वेळ प्रकल्पासाठीच द्यावा लागेल आणि त्यामुळे अभ्यासक्रम शिकवायला पुरेसा वेळ मिळणार नाही, अशी काही शिक्षकांची भावना असते. विद्यार्थ्यांला एखादा प्रकल्प करायला सांगायचा म्हणजे आपणच आपलं काम वाढवून घ्यायचं, असंही काही शिक्षकांचं मत असतं. त्यामुळे शिक्षक विद्यार्थ्यांला अतिशय सोपा किंवा अगोदरच्या विद्यार्थ्यांनी केलेलाच एखादा प्रकल्प सुचवतात आणि आपली सुटका (?) करून घेतात, असंही आढळतं. पण शिक्षकांनी आणि पालकांनी या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, कोणताही प्रकल्प पूर्णपणे विद्यार्थ्यांने करणं अपेक्षित असतं, आपण फक्त योग्य मार्गदर्शन आणि आवश्यक त्या सुविधा पुरवण्याचं काम करणं अपेक्षित आहे.

स्पर्धापरीक्षेच्या रिंगणात

स्पर्धापरीक्षेच्या रिंगणात
- डॉ. जी. आर. पाटील
 Photo: स्पर्धापरीक्षेच्या रिंगणात
डॉ. जी. आर. पाटील
यूपीएससी मुख्य परीक्षेची तयारी
मुख्य परीक्षेत जास्तीत जास्त गुणांनी यश मिळविण्यासाठी नियोजनपूर्ण अभ्यास, मुद्देसूद लिहिण्याचा सराव आणि तयारीत सातत्य आवश्यक ठरते.
गेल्या आठवडय़ात (२६ मे) रोजी संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवांकरिता पूर्वपरीक्षा पार पडली. या वर्षांपासून मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम बदललेला आहे व बदललेल्या अभ्यासक्रमानुसार होणारी मुख्य परीक्षा २०१३ ही पहिलीच परीक्षा असेल.
पूर्व परीक्षा देऊन आल्यानंतर अनेक विद्यार्थी मोठी चूक करतात ती म्हणजे पूर्वपरीक्षेचा निकाल येईपर्यंत मुख्य परीक्षेचा अभ्यास न करणे. पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झालो तरच मुख्य परीक्षेचा अभ्यास करण्याचा त्यांचा मनसुबा असतो. मात्र त्यामुळे पूर्वपरीक्षा झाल्यानंतरचा महत्त्वाचा वेळ केवळ पूर्वपरीक्षेच्या निकालाची वाट पाहण्यात निघून जातो. अशाने पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उरलेल्या काळात मुख्य परीक्षेचा अभ्यास होणे कठीण बनते. बदललेल्या अभ्यासक्रमानुसार तर एवढय़ा कमी कालावधीत मुख्य परीक्षेचा अभ्यास पूर्ण होणे कठीण आहे.
म्हणूनच पूर्वपरीक्षेत उत्तीर्ण होऊ की नाही, आपल्याला पूर्वपरीक्षेत किती मार्कस् मिळतील, इतर विद्यार्थ्यांना पेपर कसा गेला आहे इ. चर्चा करण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी लगेचच मुख्य परीक्षेच्या तयारीला सुरुवात करायला हवी. जे विद्यार्थी २०१४ मध्ये पूर्व परीक्षा देणार आहेत त्यांनीदेखील आतापासून मुख्य परीक्षेच्या तयारीला लागावे. नवीन बदललेल्या अभ्यासक्रमानुसार सामान्य अध्ययनाचा आवाका इतका वाढला आहे की, त्याचा अभ्यास केल्यानंतर पूर्वपरीक्षेत सामान्य अध्ययनाच्या पेपर १ चा अभ्यास पूर्ण होईल. त्यासाठी नव्याने पूर्वपरीक्षेच्या पेपर १ साठी खूप जास्त अभ्यास करावा लागणार नाही.
संघ लोकसेवा आयोगाच्या वेबसाइटवर (www. Upsc.gov.in) जर मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम बघितला तर त्यात एक महत्त्वाचा मुद्दा सांगितलेला आहे, तो असा की, पेपर २ ते ५ याचे स्वरूप असे असेल की, एखादा सुशिक्षित माणूस कोणत्याही विशेष ज्ञानाशिवाय (without any specialized study)  ही परीक्षा देऊ शकेल. यातील प्रश्नाद्वारे विद्यार्थ्यांचे प्रशासकीय सेवांशी संबंधित विषयाचे सामान्य आकलन तपासले जाते. याद्वारे विद्यार्थ्यांचे संबंधित विषयांचे मूलभूत ज्ञान तसेच परस्परविरोधी सामाजिक व आíथक उद्दिष्ट, मागण्या यांचे विश्लेषण करून मत बनविण्याची क्षमता याची चाचणी होते.
२०१३ च्या मुख्य परीक्षेपासून ऐच्छिक विषय एकच असणार आहे. जुन्या अभ्यासक्रमानुसार दोन ऐच्छिक विषय निवडावे लागत.
पेपर ६ व ७ जो ऐच्छिक विषयाशी संबंधित आहे, त्याचा आवाका ऑनर्स पदवी अभ्यासक्रमाएवढा असेल जो पदवीपेक्षा जास्त पण पदव्युत्तर अभ्यासक्रमापेक्षा कमी असेल. मात्र अभियांत्रिकी कायदा, वैद्यकीय शास्त्रांचा अभ्यासक्रम पदवी दर्जाचाच असेल. विद्यार्थ्यांनी मुख्य परीक्षेत कसे उत्तर लिहावे यासंबंधी एक अत्यंत महत्त्वपूर्ण ओळ या अभ्यासक्रमात नमूद केली आहे. ती म्हणजे विद्यार्थ्यांनी सुसंगत, अर्थपूर्ण आणि संक्षिप्त उत्तर लिहावे. नवीन अभ्यासक्रमानुसार मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहे -
अ) आठव्या परिशिष्टामधील कोणतीही एक भारतीय भाषा - ३०० गुण.
ब) इंग्रजी - ३००  गुण.
वरील दोन्ही पेपर्समधील गुण एकूण गुणांमध्ये ग्राह्य़ धरले जात नाहीत. मात्र वरील दोन्ही पेपर पास होणे आवश्यक असते, जर विद्यार्थी वरील पेपरमध्ये नापास झाला तर त्याचे पुढचे पेपर तपासले जात नाहीत, एकूण गुणांत ग्राह्य़ धरले जाणारे पेपर पुढीलप्रमाणे :
पेपर १ निबंध :  ( गुण २५०) :- विद्यार्थ्यांना एका विशिष्ट विषयावर निबंध लिहावा लागतो. निबंधाच्या विषयाचे पर्याय उपलब्ध असतात. निबंध विषयाशी सुसंगत, स्पष्टपणे लिहिणे अपेक्षित आहे. अभ्यासक्रमात असे नमुद करण्यात आले आहे की थेट व परिणामकारक अभिव्यक्तीस गुण दिले जातील. निबंधाचा हा पेपर मराठी भाषेतूनदेखील लिहिता येईल.
पेपर २ सामान्य अध्ययन : १ (गुण २५०) :- भारतीय संस्कृती व वारसा, जग व समाजाचा इतिहास आणि भूगोल.
पेपर ३ सामान्य अध्ययन :  २ (गुण २५० ) :- शासनयंत्रणा संविधान, प्रशासन, सामाजिक न्याय व आंतरराष्ट्रीय संबंध.
पेपर ४ सामान्य अध्ययन : ३ (गुण २५०) :- तंत्रज्ञान, आíथक विकास, जैवविविधता, पर्यावरण सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन.
पेपर ५ सामान्य अध्ययन : ४ ( गुण २५० ) :- नीतिमूल्य, एकात्मता व प्रवृत्ती.
पेपर ६ व ७ वैकल्पिक विषयासंदर्भात : विद्यार्थी हा अधिसूचनेत नमूद केलेल्या विषयांपकी कोणताही एक विषय घेऊ शकतो. त्याचे दोन पेपर असतील व प्रत्येक २५० गुणांचा असेल. म्हणजे वैकल्पिक विषय आता इंग्रजी किंवा मराठी लिहिता येईल. भाषा साहित्याबाबत जी अट सुरुवातीला आयोगाने टाकली होती, ती आता रद्द करण्यात आली आहे, नवीन अधिसूचनेनुसार आता कोणत्याही शाखेतील विद्यार्थी ऐच्छिक विषय म्हणून भाषा साहित्य घेऊ शकतो.
लेखी परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. मुलाखतीसाठी  २७५ गुण आहेत.
संघ लोकसेवा आयोगाच्या अधिसूचनेनुसार असे लक्षात येते की, नवीन बदललेल्या अभ्यासक्रमात ऐच्छिक विषयाचे महत्त्व थोडे कमी केले आहे. कारण जुन्या अभ्यासक्रमानुसार दोन ऐच्छिक विषय घ्यावे लागत. त्याला प्रत्येकी ६०० गुण होते. म्हणजे २३०० गुणांपकी १२०० गुण फक्त ऐच्छिक विषयांना होते. अगदीच टक्केवारीच्या भाषेत बोलायचे झाल्यास ५२ टक्के गुण ऐच्छिक विषयांना होते. नवीन अभ्यासक्रमानुसार, वैकल्पिक विषयांना फक्त ५०० गुण असतील म्हणजे २४ टक्के गुण विषयाला आहेत.
याउलट जुन्या अभ्यासक्रमानुसार सामान्य अध्ययनासाठी ६०० गुण होते. आता सामान्य अध्ययनाची व्याप्ती वाढून त्याचे चार पेपर करण्यात आले असून त्यासाठी १००० गुण असतील. अगदीच टक्केवारीनुसार बोलायचे झाल्यास जुन्या  अभ्यासक्रमानुसार २६ टक्के गुण सामान्य अध्ययनाला होते, तर नवीन अभ्यासक्रमानुसार त्याची व्याप्ती २६ टक्क्य़ांवरून ४६ टक्क्य़ांपर्यंत वाढविण्यात आली आहे.
 मुख्य परीक्षेची तयारी कशी कराल ?
पूर्व परीक्षा ही बहुपर्यायी स्वरूपाची असते, तर मुख्य परीक्षा दीघरेत्तरी स्वरूपाची असते. जे विद्यार्थी २०१४ च्या परीक्षेसाठी तयारी करीत असतील त्यांनी मुख्य परीक्षेची रणनीती वेगळी ठेवावी. कारण त्यांच्या तयारीसाठी बराच अवधी त्यांच्या हाताशी आहे. अशा विद्यार्थानी सर्वप्रथम एन.सी.आर.टी.ची पाचवी ते बारावीपर्यंतची पुस्तके वाचून काढावीत. शक्यतो त्यांच्या नोट्स तयार कराव्यात. या  पुस्तकात काही संकल्पना अंत्यत सोप्या भाषेत दिल्या असल्याने, एखाद्या प्रश्नाचे उत्तर लिहिताना मुद्देसूद आणि प्रभावीपणे लिहिता येते. नवीन अभ्यासक्रम जर बारकाईने अभ्यासला तर सामान्य अध्ययानाचा पेपर चालू घडामोडीशी संबंधित आहे, म्हणजे आपल्या अवतीभोवती काय घडत आहे,  त्याचा आपल्या देशाच्या राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणावर कसा प्रभाव पडतो, याचा बारकाईने अभ्यास करावा. त्यासाठी रोजच्या रोज कमीत कमी दोन दैनिकांचे वाचन करावे, त्यांची टिपणे काढावीत. यांचा सर्वात जास्त फायदा मुख्य परीक्षेसाठी होतो. टी.व्ही.वर दिवसातून एकतरी कार्यक्रम देशात, आंतरराष्ट्रीय स्तरावर काय घडले, यासंबंधी चर्चासत्रांचा असतो. त्या विषयाशी संबंधित तज्ज्ञांमार्फत घटनेचा ऊहापोह होत असतो. असे कार्यक्रम अवश्य पाहावेत. शक्य झाल्यास अशा कार्यक्रमांचे रेकॉìडग करून ठेवावे. ते शक्य नसेल तर काही मुद्दे कार्यक्रम पाहताना लिहून ठेवावेत. त्यावर परीक्षेत कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो, याचा विचार करून असा प्रश्न आल्यास आपण कसे उत्तर लिहू शकतो, हे प्रत्यक्ष लिहून पाहावे. असे केल्यास सामान्य अध्ययनात प्रश्न कसाही विचारला गेल्यास त्याचे मुद्देसूद उत्तर लिहिण्यास विद्यार्थ्यांना शक्य होते. अनेक विद्यार्थ्यांची एक चूक होते ती म्हणजे मुख्य परीक्षेला त्यांचा अभ्यास  चांगला असतो, परंतु प्रश्नांची उत्तरे कशी लिहावीत याचा सराव न केल्याने त्यांना मुख्य परीक्षेत चांगले गुण मिळत नाहीत. 
गेल्या चार ते पाच वर्षांच्या मुख्य परीक्षेच्या पेपरचा आढावा घेतल्यास असे लक्षात येते की, आयोग आजकाल प्रश्न थेट विचारले जात नाहीत. म्हणून केवळ ठराविक पुस्तक किंवा कोचिंग क्लासच्या नोट्सचे पाठांतर करून या परीक्षेत यश मिळवता येत नाही. पुस्तके किंवा नोट्स तुम्हाला त्या विषयासंदर्भातील माहिती देऊ शकतात, मात्र उत्तर तुम्हाला परीक्षेच्या काळात स्वत:च तयार करावयाचे असते. यासाठी सराव केला नसेल तर प्रचंड नुकसान होते.
उदा. भारत व पाकिस्तान संबंधांची चर्चा करा, अशा थेट प्रश्नाऐवजी 'नुकत्याच पाकिस्तानमध्ये झालेल्या निवडणुकीत नवाज शरीफ जिंकून आलेत. त्यांच्या निवडीमुळे भारत-पाकिस्तान संबंधांवर कसा परिणाम होईल, याचे टीकात्मक परीक्षण करा-' असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणूनच प्रश्नांची उत्तरे लिहिण्याचा सराव असेल व अशी उत्तरे तज्ज्ञ प्राध्यापकांकडून किंवा त्याविषयाशी संबंधित तज्ज्ञ व्यक्तीकडून तपासून घेतली असतील तर विद्यार्थ्यांना अचूक उत्तर कसे लिहावे हे समजू शकते आणि परीक्षेत प्रश्न कसाही विचारला गेला तरी मुद्देसूद उत्तरे लिहता येतात. रोजचे टिपण, त्यासंबंधित आपण तयार केलेली प्रश्नोत्तरे यासाठी स्वतंत्र वही करावी व त्यांचे वाचन वेळोवेळी करावे. 
जे विद्यार्थी २०१३ मध्ये मुख्य परीक्षा देणार आहेत, त्यांनी अभ्यासाची स्वतंत्र रणनीती तयार करावी. मुख्य परीक्षेला सुमारे सात महिन्यांचा अवधी आहे. जर आजपासूनच अभ्यासाला सुरुवात केली तर हा कालावधी वैकल्पिक विषयाची तयारी व सामान्य अध्ययनाची तयारी यासाठी पुरेसा आहे. मात्र हा कालावधी विद्यार्थी कसा वापरतात, यावर बरेच काही अवलंबून राहील. नवीन अभ्यासक्रमानुसार, सामान्य अध्ययनाच्या चार पेपरसाठी विशेष अध्ययन सामग्री लगेच उपलब्ध होणार नाही.
मात्र, बदललेला अभ्यासक्रम जुन्या अभ्यासक्रमापेक्षा अगदी वेगळा आहे, असे नाही. तयारी करताना अभ्यासक्रमात दिलेला प्रत्येक मुद्दा व्यवस्थितपणे अभ्यासावा. जर काही मुद्दे पुस्तकात आपणास सापडत नसतील तर इंटरनेटचा वापर करावा. जास्तीत जास्त लिहिण्याचा सराव करावा. मागच्या १० वर्षांच्या प्रश्नपत्रिकेत कोणते प्रश्न कसे विचारले गेले आहेत, याचा आढावा घ्यावा. त्यातील काही प्रश्न जे नवीन अभ्यासक्रमाशी संबंधित आहेत, ते शब्दमर्यादा पाळून लिहून पाहावेत आणि तज्ज्ञांकडून ते तपासून घ्यावेत. लिहिण्याचा आपण जेवढा जास्त सराव कराल तेवढे आपणास फायदेशीर असेल. 
सामान्य अध्ययनाच्या अभ्यासासाठी संदर्भ पुस्तके -
भारतीय संस्कृतीचा वारसा यासाठी स्पेक्ट्रम प्रकाशन, भारतीय इतिहासासाठी बिपीन चंद्रा, ग्रोव्हर आणि ग्रोव्हर, भूगोलासाठी सिवदर सिंग, भारतीय भूगोलासाठी, माजिद हुसेन, अर्थशास्त्रासाठी २०१३ केंद्र सरकारची आíथक पाहणी दत्त आणि सुंदरम किंवा उमा कपिला यांचे पुस्तक, विज्ञान व तंत्रज्ञानासाठी विझार्ड प्रकाशनाचे किंवा टी.एम.एच. प्रकाशनाचे पुस्तक त्याचप्रमाणे 'इंडिया इयर बुक २०१३' मधील विज्ञान तंत्रज्ञानाचा भाग, तसेच मागच्या काही महिन्यांतील व परीक्षेपर्यंत 'सायन्स रिपोर्टर' या मासिकातील अभ्यासाशी संबंधित लेख, सामान्य अध्ययन पेपर-२, शासनयंत्रणा, संविधान प्रशासन यासाठी लक्ष्मीकांत यांचे पुस्तक या पुस्तकांच्या अभ्यासाबरोबरच इग्नू (कॅठडव) यांची अभ्यासक्रमाशी संलग्न साहित्य याचा उपयोग करावा. पेपर मराठीमध्ये लिहिणार असाल तर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची अभ्यासक्रमाशी संलग्न अशी पुस्तके यांचा वापर करावा. 
सामान्य अध्ययनात, मुख्य परीक्षेसाठी प्रश्न २ मार्क्‍स, ३ मार्क्‍स, ५ मार्क्‍स, १० मार्क्‍स, १५ मार्क्‍स तसेच २० मार्क्‍स यासाठीही विचारले जातात. प्रत्येक प्रश्नांना विशिष्ट शब्दमर्यादा दिलेली असते. शक्यतो शब्दमर्यादेतच उत्तर लिहावे. उत्तर संक्षिप्त व मुद्देसूद असावे. प्रश्न व्यवस्थित समजून उत्तर लिहावे, म्हणजे चुका होण्याची शक्यता कमी असते. कमी शब्दात अर्थपूर्ण सुसंगत व मुद्देसूद उत्तर लिहिण्याची सवय आत्तापासूनच करावी. 
आयोगाने आपल्या वेबसाइटवर जो अभ्यासक्रम दिलेला आहे, त्यात सामान्य अध्ययनासाठी खालील उपघटकांचा समावेश होतो.
सामान्य अध्ययन पेपर १ : 
०यामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत कला, साहित्य व स्थापत्य यांची वैशिष्टय़े.
०यामध्ये १८ व्या शतकाच्या मध्यापासून आजपर्यंत आधुनिक भारताचा इतिहास, त्यातील महत्त्वाच्या घटना, व्यक्ती, महत्त्व आणि समस्या. 
०भारताचा स्वांतत्र्यलढा, त्यातील महत्त्वाचे टप्पे, देशाच्या विविध भागांतून व विविध व्यक्तींनी दिलेले योगदान. 
०स्वातंत्र्यप्राप्तीनंतर दृढीकरण व देशांतर्गत पुनर्रचना. 
०१८ व्या शतकापासून जगाचा इतिहास, औद्योगिक क्रांती, महायुद्ध, राष्ट्रीय सीमांची पुनर्रचना, वसाहतीकरण, निर्वसाहतीकरण, समाजवाद, साम्राज्यवाद, भांडवलवाद, त्यांचे प्रकार आणि त्यांचा समाजावरील परिणाम.
०भारतीय समाजाची ठळक वैशिष्टय़े व भारतातील वैविधता. 
०महिला आणि महिला संघटनांची भूमिका, लोकसंख्या व संबंधित समस्या, दारिद्रय़ आणि विकासाच्या समस्या, नागरीकरण ,त्यांच्या समस्या व उपाय. 
०जागतिकीकरणाचे भारतीय समाजावरील परिणाम. 
०सामाजिक शक्तीकरण, धर्मातरता, प्रादेशिक वाद व धर्मनिरपेक्षता. 
०जगाच्या प्राकृतिक भूगोलाचे वैशिष्टय़. 
०महत्त्वाच्या नसíगक साधनसंपत्तीचे जगातील वितरण (दक्षिण आशिया व भारतीय उपखंड यांना मिळून) प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र यासंबंधित औद्योगिक विकास हा जगातील विभिन्न भागात कसा झाला, यासंबंधीची कारणे (भारतासह.) 
०महत्त्वाच्या भौगोलिक समस्या उदा. भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी, चक्रीवादळे इ. महत्त्वाची प्राकृतिक वैशिष्टय़े, त्यांचे स्थान व त्यांच्यातील बदल, जलस्थान व हिमनग, जैवसृष्टी व बदल हा अभ्यासक्रम सामान्य अध्ययन पेपर १ मध्ये नमूद केलेला आहे.
कुठल्याही क्षेत्रात यश मिळविण्यासाठी सरावाची अत्यंत आवश्यकता असते. जेते खेळाडू किंवा यशस्वी व्यक्तींच्या आयुष्याकडे पाहिल्यास त्यांनी केलेला सराव आणि सरावात ठेवलेले सातत्य यांमुळे त्यांना यश मिळाल्याचे आपणास दिसते. हा नियम संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठीदेखील लागू होतो. 
मुख्य परीक्षेत जास्तीत जास्त गुणांनी यश मिळविण्यासाठी मुद्देसूद लिहिण्याचा सराव, सातत्यपूर्ण करावा हे सूत्र आहे, हे लक्षात असू द्या!
यूपीएससी मुख्य परीक्षेची तयारी
                           मुख्य परीक्षेत जास्तीत जास्त गुणांनी यश मिळविण्यासाठी नियोजनपूर्ण अभ्यास, मुद्देसूद लिहिण्याचा सराव आणि तयारीत सातत्य आवश्यक ठरते.
                       पूर्व परीक्षा देऊन आल्यानंतर अनेक विद्यार्थी मोठी चूक करतात ती म्हणजे पूर्वपरीक्षेचा निकाल येईपर्यंत मुख्य परीक्षेचा अभ्यास न करणे. पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झालो तरच मुख्य परीक्षेचा अभ्यास करण्याचा त्यांचा मनसुबा असतो. मात्र त्यामुळे पूर्वपरीक्षा झाल्यानंतरचा महत्त्वाचा वेळ केवळ पूर्वपरीक्षेच्या निकालाची वाट पाहण्यात निघून जातो. अशाने पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उरलेल्या काळात मुख्य परीक्षेचा अभ्यास होणे कठीण बनते. बदललेल्या अभ्यासक्रमानुसार तर एवढय़ा कमी कालावधीत मुख्य परीक्षेचा अभ्यास पूर्ण होणे कठीण आहे.
म्हणूनच पूर्वपरीक्षेत उत्तीर्ण होऊ की नाही, आपल्याला पूर्वपरीक्षेत किती मार्कस् मिळतील, इतर विद्यार्थ्यांना पेपर कसा गेला आहे इ. चर्चा करण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी लगेचच मुख्य परीक्षेच्या तयारीला सुरुवात करायला हवी. जे विद्यार्थी २०१४ मध्ये पूर्व परीक्षा देणार आहेत त्यांनीदेखील आतापासून मुख्य परीक्षेच्या तयारीला लागावे. नवीन बदललेल्या अभ्यासक्रमानुसार सामान्य अध्ययनाचा आवाका इतका वाढला आहे की, त्याचा अभ्यास केल्यानंतर पूर्वपरीक्षेत सामान्य अध्ययनाच्या पेपर १ चा अभ्यास पूर्ण होईल. त्यासाठी नव्याने पूर्वपरीक्षेच्या पेपर १ साठी खूप जास्त अभ्यास करावा लागणार नाही.
संघ लोकसेवा आयोगाच्या वेबसाइटवर (www. Upsc.gov.in) जर मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम बघितला तर त्यात एक महत्त्वाचा मुद्दा सांगितलेला आहे, तो असा की, पेपर २ ते ५ याचे स्वरूप असे असेल की, एखादा सुशिक्षित माणूस कोणत्याही विशेष ज्ञानाशिवाय (without any specialized study) ही परीक्षा देऊ शकेल. यातील प्रश्नाद्वारे विद्यार्थ्यांचे प्रशासकीय सेवांशी संबंधित विषयाचे सामान्य आकलन तपासले जाते. याद्वारे विद्यार्थ्यांचे संबंधित विषयांचे मूलभूत ज्ञान तसेच परस्परविरोधी सामाजिक व आíथक उद्दिष्ट, मागण्या यांचे विश्लेषण करून मत बनविण्याची क्षमता याची चाचणी होते.

                                २०१३ च्या मुख्य परीक्षेपासून ऐच्छिक विषय एकच असणार आहे. जुन्या अभ्यासक्रमानुसार दोन ऐच्छिक विषय निवडावे लागत.
 
पेपर ६ व ७ जो ऐच्छिक विषयाशी संबंधित आहे, त्याचा आवाका ऑनर्स पदवी अभ्यासक्रमाएवढा असेल जो पदवीपेक्षा जास्त पण पदव्युत्तर अभ्यासक्रमापेक्षा कमी असेल. मात्र अभियांत्रिकी कायदा, वैद्यकीय शास्त्रांचा अभ्यासक्रम पदवी दर्जाचाच असेल. विद्यार्थ्यांनी मुख्य परीक्षेत कसे उत्तर लिहावे यासंबंधी एक अत्यंत महत्त्वपूर्ण ओळ या अभ्यासक्रमात नमूद केली आहे. ती म्हणजे विद्यार्थ्यांनी सुसंगत, अर्थपूर्ण आणि संक्षिप्त उत्तर लिहावे. 

नवीन अभ्यासक्रमानुसार मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहे -
अ) आठव्या परिशिष्टामधील कोणतीही एक भारतीय भाषा - ३०० गुण.
ब) इंग्रजी - ३०० गुण.
वरील दोन्ही पेपर्समधील गुण एकूण गुणांमध्ये ग्राह्य़ धरले जात नाहीत. मात्र वरील दोन्ही पेपर पास होणे आवश्यक असते, जर विद्यार्थी वरील पेपरमध्ये नापास झाला तर त्याचे पुढचे पेपर तपासले जात नाहीत, 

एकूण गुणांत ग्राह्य़ धरले जाणारे पेपर पुढीलप्रमाणे :